Mangaon on Mumbai-Goa Highway -माणगाव च्या काळ नदी काठचे Touring Talkies आणि बालपण

  काळ नदी पल्याडच्या ‘धुंद’ आठवणी

Poster of an old Bollywood film DHUND (The Mist) 1973

माणगावच्या काळ नदी च्या cinematic memories

माझा जन्म तसा मुंबईचा. मुंबई च्या दक्षिण पूर्व बंदराजवळच ब्रिटिश कालीन सेंट जाॅर्ज हाॅस्पिटलातला. जन्म घेताच समुद्री खार्या वार्याचा श्वास घेतलेला मी. नदी तशी फार आली नाही आयुष्यात. कुर्ला पश्चिमेकडून ३११ किंवा ३१३ बस पकडून जाताना तेलकट काळ्या पाण्याचा नाला दिसायचा तो नाला नाला नसून मिठी नदी आहे हे फार उशीरा कळालं. बाकी खरी नदी पाहिली ती सहा सात वर्षांचा असताना.. माणगावला .

वडील अबकारी खात्यात होते. तीन एक वर्षांत बदली व्हायची. त्यांची पहिली पोस्टिंग महाबळेश्वर ला होती. तिथे तर कृष्णेचा उगम. पण तेंव्हा मी खूप लहान होतो. आठवत नाही काही. तिथून बदली खामगांव ला झाली. तिथे गच्चीवर येणार्या माकडांच्या टोळ्या आठवतात. त्यांनंतर एकदोन वर्ष आम्ही मुंबईला आत्याच्या घरी रहायला लागलो. पहिली दुसरीत असेन मी. एका संध्याकाळी वडील आई व आत्याला बदलीचं सांगताना मी बिछान्यावर पडल्या पडल्या ऐकलं. आपण मुंबई सेाडतोय याचं थोड वाईटच वाटलं.

माणगाव ला आमच बिर्हाड पोचलं. वर्षभर गावाच्या उत्तर टोकाला राहून मग घर बदलून दक्षिणेकडे म्हणजे  काळ नदी कडे आम्ही राहू लागलो.  एक मजली इमारतीच्या तळाची खोली वडिलांनी भाड्याने घेतली होती. इमारतीच्या डाव्या बाजूला उकिरड्यावर एक मोठं चाफ्याचं झाड होतं त्याला छान फुलं येत. मागच्या बाजूला शेवग्याच्या शेंगांची मोठ मोठी झाडं व त्याच्या तळाला कर्दळी व आळुच्या रोपांची वर्दळ. माणगावच्या हवेत काही विशिष्ट असा रान  वनस्पतींचा  गंध होता. इमारती समोरचा रस्ता उजव्या बाजूने बाहेर पडे तो सरळ मुंबई गोवा हायवेवर. बाहेर येताना दोन्ही बाजूला विटांच्या भिंती असलेल्या अरुंद गल्लीतून यावे लागे. या गल्लीला तेल गुळ धान्य आणि आईस कॅंडी यांचा मिश्र असा वास येई कारण डाव्या बाजूला आमच्या घर मालक मारवाड्यांचं किराणा दुकान होतं व उजव्या बाजूला शंकर शेट यांची आईस कॅंडी ची फॅक्ट्री होती. मारवाड्यांची माझ्याच वयाची मुलगी गुलाब गोरीपान छान अशी होती पण मला दुकानाबाहेर पत्र्यावरच्या निरमा वाॅशिंग पावडर जाहिरातीतील शाॅर्ट स्कर्ट मधली गोंडस  मुलगी तेंव्हा जास्त आवडायची. रस्त्याच्या पलीकडे फाॅरेस्ट आॅफिसर चा बंगला होता .त्यांची मुलगी मीरा तर माझ्या वर्गातच होती. हायवेने डाव्या बाजूला गोव्याकडे जाताना काळ नदी आडवी लागे. इथे गाव संपे. एक ब्रिटिश कालीन दगडी पूल या काळ नदीला ओलांडे. तो आजही तसाच आहे. पूलाला लागूनच डाॅ भावेंची डिस्पेंसरी होती. अरे हो डाॅ भावेंची मुलगी आसावरी ही माझ्या वर्गात होती. डाॅक्टरांना संगीताची आवड होती .संध्याकाळी डिस्पेंसरीतून तबला पेटीचा आवाज येई कधी कधी. काळ नदी ओलांडली की डाव्या बाजूला पत्र्याच्या भिंतींचं पण छप्पर नसलेलं ओपन टूरिंग टाॅकीज होतं. हे टाॅकीज मला माणगावच्या त्या वेगळ्या वातावरणात माझं मुंबई कनेक्शन वाटे.

मी नवीन लोकांमधे पटकन मिसळत नसे. मानगावच्या पहिल्याच आठवड्यात त्या गल्लीत मला दोन तीन पोरांनी पकडलं . माझ्या दोन्ही हातात किरानाच्या पुड्या होत्या. एका पोरानी माझा पाय धरून पाडण्याचा प्रयत्न करताच मी जोराचा हिसका दिला तशी ती पोरं पळाली. हा काहीतरी रॅगींग सारखा प्रकार असावा. पुढे एक मुलगा माझ्या मोठ्या भावाला निरोप देवून गेला ‘ तुला काळ नदीवर भेटायला बोलवलय’ भाऊ सरळ गेला . मी काय होतय पहायला पाठोपाठ गेलो. पहातो तर नदी काठावर फिल्मी स्टाईल मधे मारामारी चालली होती. पण ही लुटूपुटूची मारामारी थोडा वेळच टिकली. भाऊ आणि ती मुलं मित्र असल्या सारखे हसत बोलताना मी पाहिले. मोठा भावू सोशल होता.त्यात त्याचे मित्र त्याच्या वयापेक्षा मोठे असत.  एकदा आम्ही गावातल्या मुलांबरोबर जंगलात काळ नदीच्या संगमावर पिकनिक ला ही गेलो होता. श्रीखंड पुरीचा मोठा स्टीलच डबा सायकल वर ठेवून आम्ही संगमावर पोचलो होतो. दोन नद्यांचं पाणी एकमेकांत मिसळताना खूपच गूढ वाटतं. या पाण्यात प्राण असावा असं वाटतं. या संगमा जवळच एक पुरातन शिव मंदीर ही होतं. मंदिरात जटाधारी उग्र भेदक डोळ्यांचा असा पुजारी बसलेला असे. या पुजार्याची जरा भीतीच वाटे. मंदिरा समोर आवळ्याचे एक झाड होते.कोवळे फिकट हिरवे आवळे खावून मग नदीचं पाणी प्यायल्यास ते गोड लागते हा चमत्कार ही मी माणगावातच अनुभवला .

Landscape picture with river flowing upword down

Touring Talkies – रात्रीची थंडी आणि नदीकाठचा Cinema

काळ नदी पलीकडच्या त्या टाॅकीजचा प्रोजेक्टर आॅपरेटर  माझ्या भावाचा मित्रच होता. या टाॅकीज ला फक्त रात्रीचे शो होत. दिवसा हा आॅपरेटर तुटलेली रीळं सोल्यूशन ने चिकटवत बसे. आधी तो फिल्म चे काठ ब्लेडने चांगले  खर्डून घेई ,मग सेल्यूशन लावून दोन्ही काठ एकमेकांवर चिकटवी. या सोल्यूशन चा वास मला खूप मस्त वाटायचा . थंडीच्या दिवसात नदी जवळ असल्यामुळे  रात्री च्या शोला खूपच गारठा जाणवे. जमीन, बाकडा व खुर्ची (पत्र्याची) अशी तिकिटे मिळत. चादरी शाली घेवून गारठलेल्या फोल्डींग लोखंडी  खुर्चीवर बसून लोक शिस्तीत सिनेमाचा आस्वाद घेत. सांकेतीक दृश्य दाखवण्याची  एक दिग्दर्शकिय skill तेंव्हा सीनेमांमधे  रूढ होती. प्रणय दृश्यांत चरम अवस्था दाखवताना दिग्दर्शक दोन फुले एकमेकांवर आपटताना दाखवी .अशा वेळी पत्र्याच्या खुर्चीवरचे काही दर्दी व जाणकार प्रेक्षक ‘वाह .. डायरेक्शन आहे!!’ अशी दाद देत.  गावात तीन-चारच रिक्षा असल्यामुळे परतताना रिक्षाची फारच वाट पहावी लागे. कडाक्याच्या थंडीत डोळ्यावर अनावर झोपेची झापड घेवून कधी चालतच पुलावरून नदी ओलांडून आम्ही निघत असू.अशावेळी उजव्या बाजूला नदी काठच्या स्मशानाच्या छोट्या चौथर्याची जाणीव होई आणि रसत्याच्या कडेची उंच चिंचेची झाडं भीतीत अजूनच भर घालीत. तसं काळ नदी म्हणजे माझ्यासाठी सिनेमाचं संकेत स्थळ होतं. नवीन येणार्या सिनेमांची मी आतुरतेने वाट पाही . शंकरशेटांच्या आईस फॅक्टरी समोरच्या विजेच्या खांबावर लागणार्या नवीन पोस्टर ची मी वाट पाहत असे. माहित नाही का पण काळ नदीवरच्या त्या थेटरात पाहिलेला बी. आर. चोप्रांचा  murder mystery असलेला ‘धुंद ‘ सिनेमा मला विशेष आठवतो. विशेषत: त्यातलं ते थीम साॅंग.. “संसार की हर शय का ..इतना ही फसाना है .. इक धुंद से आना है.. इक धुंद से जाना है”  हे गाणं काळ नदीचंच theme song वाटत मला. माणगावातल्या तीन चार वर्षांच्या वास्तव्यात सिनेमा रिळ जोडणी च्या त्या सोल्यूशन  मुळे माझा काळ नदीशी काही कनेक्ट तयार झाला आहे. म्हणूनच स्लीपर बस ने गोव्याहून मुंबईस परतताना मी मध्यरात्री अचानक जागा होवून खिडकीचा पडदा सहज सारून पाहिल्याचं मला आठवतय.  मी बाहेर पाहिलं तर योगा योगाने रात्रीच्या त्या अंधारात काळ नदीचं पात्रं चमकताना मला दिसलं होतं….बस त्या जुन्या ब्रिटीशकालीन दगडी पुलावरून मुंबई कडे चालली होती…

Song -इक धुंद से आना है Film-धुंद

Singer-महेंद्र कपूर Courtesy -Youtube
जीवनाचे अध्यात्म सहजतेने सांगणारे तुमचेही एखादे आवडते सिनेगीत असेलच ना? जरूर सांगा-अविनाश भानुआशा घोडके

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

0 thoughts on “Mangaon on Mumbai-Goa Highway -माणगाव च्या काळ नदी काठचे Touring Talkies आणि बालपण”

  1. खूप छान वर्णन केलंय तुम्ही. बालपणाचा आठवणी. सुंदर.

    Reply

Leave a Comment