Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Fusion Guitarist रवि अय्यर – आठवणीतले दिवस

पुरानी जीन्स आणि गिटार

रवी अय्यर – हेड टर्नर ते हेड बँगर फ्यूजन गिटारवादक

 

८० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात, जर कोणी लेव्हीस जीन्स घातली असेल, तर डोळे तिथे वळायचे. आणि तीही जर fade झालेली जीन्स असेल तर मग विचारायलाच नको. रवी असाच एक हेड टर्नर होता, जो न धुतलेल्या, मळकट डेनिम जीन्स आणि खांद्यावर येणारे लांब केस घेवून ऐटित फिरायचा.  तो आपल्या रॉक ग्रूप विच हॅमरमध्ये हेड बँगर रॉक गिटारवादकही होता.

 

रवी माझा जिवलग मित्र श्रीधर गायतोंडे याचा चुलत भाऊ होता. मी श्रीधरसोबत रवीच्या परेल च्या घरी जात असे. त्या काळात हिंदी चित्रपटांचा दर्जा खूप घसरला होता . महाविद्यालयीन Hep crowd हिंदी चित्रपटांना कूल मानत नसत.रवी आणि श्रीधर रवीच्या डेकवर इंग्रजी गाणी लावायचे, ज्यातला एक शब्दही मला समजायचा नाही. मला आठवतं, की रवी जेव्हा जेव्हा डेकवर एखादं विशिष्ट गाण्याचं टेप लावायचा, तेव्हा त्याचा एक कुत्रा मोठ्याने ओरडू लागायचा. हा प्रकार खरंच विचित्र होता.

 

मी रवीकडे गिटारची काही मूलभूत गोष्टी शिकायचा प्रयत्न केला… पण योग्य तार छेडने मला जमलं नाही खरं. रवी एक चांगला डान्सरही होता. तो जॉन ट्रॅव्होल्टाचा चाहता होता. तो क्वचितच कुर्ल्याला यायचा. पण जेव्हा तो माझ्यासोबत आणि श्रीधरसोबत संध्याकाळच्या फेरीसाठी आमच्या कॉलनीत उतरायचा; तेव्हा प्रत्येकजण या सडपातळ, सुंदर लांब रेशमी केसांच्या, फिकट जीन्समधल्या मुलाकडे टक लावून पाहायचा.

 

मला एक संध्याकाळ आठवते. मी रवीला कुर्ला बस स्टॉपवर सोडत होतो. बस अजून आलेली नव्हती. मी काहीतरी बोलणार होतो, पण रवीने मला थांबवलं. तो जवळच्या लाऊडस्पीकरमधून येणारा आवाज काळजीपूर्वक ऐकू लागला. ते गाणं होतं लता मंगेशकर यांचं, सत्यम शिवम सुंदरम या गाण्यातलं ते प्रसिद्ध अलाप. मला रवीच्या डोळ्यांत कौतुक दिसलं. “सुपर्ब,” तो हळूच म्हणाला. मी विचार करत राहिलो, हा इंग्रजी संस्कृतीत वाढलेला मुलगा लताजींचं गाणं कसं काय Appreciateकरतोय?

 

रवी त्याच्या फिकट लेव्हीस जीन्समध्ये बसमध्ये चढून गेला. पुन्हा वर्षानुवर्षे आमची भेट झाली नाही… आठवणी त्याच्या डेनिम जीन्ससारख्या फिकट होत गेल्या. आणि अचानक मला हा लेख दिसला, रवीविषयी… जो आता रॉक संगीतातला एक अनुभवी फ्यूजन गिटारवादक झालाय. लता जी आणि जॉन ट्रेवोल्टा या दोघांमधे रवीला का रस होता ते आता कळते…

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now