Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

साधना आमटेंसाठी बाबा आमटेंनी सासर्यांपुढे अश्रू ढाळले होते….

बाबा आमटे म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते आनंदवन, कुष्ठरुग्णांची सेवा आणि समाजासाठी केलेले अफाट कार्य. पण या महान कार्यामागे एक तेजस्वी, समर्पित आणि कर्तृत्ववान स्त्री होती – साधना आमटे. ही साधना आयुष्यात येण्यासाठी बाबा आमटेंनी काय यत्न केला त्याची ही गोष्ट आहे. Story of Baba Amte’s Proposal for Sadhana Amte.

साधना आमटेंसाठी बाबा आमटेंनी सासर्यांपुढे अश्रू ढाळले होते....

बाबा आमटेंची साधना प्राप्ती

ब्रिटिश आमदनीतील एका उच्च अधिकाऱ्याचे चिरंजीव, मुरलीधर आमटे (बाबा आमटे) एका अत्यंत संपन्न सरंजामी कुटुंबात जन्मलेले. विकिपीडिया नुसार बाबांकडे वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी स्वतःची बंदूक होती आणि ते खऱ्या वाघाच्या कातडीच्या सीट कव्हर असलेली स्पोर्ट्स कार चालवायचे.

पण कायद्याची पदवी घेतल्यानंतर तरुण बाबा गांधीवादी विचारांनी खूप प्रभावित झाले. आता आपण आयुष्य गरीब आणि दुर्बलांच्या सेवेत घालवायचे, असे त्यांनी ठरवले. डोळ्यासमोर एक मिशन होते. आणि हे मिशन पूर्ण करायचं असेल, तर त्यासाठी आयुष्यात एक जीवनसाथी असावा, असं त्यांना वाटू लागलं.

तरुण बाबा आमटे यांनी आपली जोडीदार म्हणून कुमारी इंदू धुळे यांची निवड केली होती. पण इंदू यांचे वडील श्री. धुळे हे आपल्या लाडक्या मुलीचा हात एखाद्या कफल्लक समाजसेवक मुरलीधर (बाबा) आमटे यांच्या हाती देण्यासाठी अजिबात तयार नव्हते.

मुरलीधरांनी मात्र मनाचा निर्धार केला होता. ते श्री. धुळेंना एकामागून एक पोस्टकार्ड्स पाठवत राहिले. शेवटी उत्तर न मिळाल्याने निराश होऊन मुरलीधर स्वतः श्री. धुळेंच्या घरी जाऊन पोहोचले. ते श्री. धुळेंसमोर बसले. त्यांना सांगितले की त्यांना समाजाची सेवा करायची आहे, ज्यासाठी नैतिक आणि भावनिक आधारासाठी त्यांना जीवनसाथीची गरज आहे. श्री. धुळे मात्र अजिबात प्रभावित झाले नाहीत आणि ते तटस्थपणे बसून राहिले.

श्री. धुळे काहीही उत्तर देत नाहीत हे पाहून, मुरलीधर आता निराश झाले. जमीनीवर बसल्या बसल्या निराशेने त्यांनी आपले डोके आता गुडघ्यात घातले व ते रडू लागले… एवढे रडले की जमीन त्यांच्या अश्रूंनी भिजून गेली. शेवटी श्री. धुळेंचे मन वितळले आणि त्यांनी होकार दिला. अश्रुंचे अर्ध्य देवून अशा प्रकारे बाबांनी इंदू धुळे यांना आपल्या आयुष्याची साधना बनवली. बाबा आमटेंच्या कार्यात साधनाताईंचे योगदान फार मोठे आहे.

‘चला’ या एका शब्दाने सुरू झालेला प्रवास

बाबा आणि साधनाताई यांचे हे सहजीवन म्हणजे केवळ एक विवाह नव्हता, तर एका पवित्र ध्येयासाठी केलेली ती आराधना होती. लग्नाच्या काही आठवड्यांतच बाबांनी वकिली सोडण्याचा आणि समाजकार्यात जाण्याचा निर्णय घेतला. नववधू असलेल्या साधनाताईंनी डोळ्यात पाणी न आणता, अगदी सहजतेने फक्त एक शब्द म्हटला, “चला” . हा एक शब्द होता त्यांच्या अतूट विश्वासाचा आणि समर्पणाचा.

त्यानंतरचे आयुष्य कठोर परिश्रम आणि त्यागाचे होते. जंगलात, वाघ-विंचूंच्या भीतीने भरलेल्या ओसाड जमिनीवर बाबा आणि साधनाताईंनी सहा कुष्ठरुग्णांसह आनंदवनची स्थापना केली. सुरुवातीचे दिवस अविश्वसनीय होते. पाण्यासाठी विहीर खणायला सात आठवडे लागले. बाबा म्हणायचे, “त्या विहिरीत पाण्यापेक्षा जास्त आमचे अश्रू होते.” पण या अश्रूंमधूनच नव्या आशेचं गाव उभं राहिलं.

साधनाताईंचे अतुलनीय योगदान

केवळ बाबांची पत्नी म्हणून नव्हे, तर एक समान विचारांची जोडीदार म्हणून साधनाताईंनी आनंदवनच्या प्रत्येक व्यक्तीला आईचं प्रेम दिलं. प्रसंगी कुष्ठरोगी व्यक्ती चे कपडे ही त्यांनी धुतले. त्यांच्या या सेवेमुळे आणि त्यागामुळेच आनंदवनाला ‘मायेचं’ रूप मिळालं. त्यांनी समिधा सारखी पुस्तकं लिहिली, ज्यात त्यांनी या संपूर्ण प्रवासाचं सुरेख वर्णन केलं आहे.

बाबा २००८ मध्ये निधन पावले , तर साधनाताई २०११ मध्ये गेल्या . पण त्यांनी मागे ठेवलेला वारसा अविस्मरणीय आहे. त्यांचे पुत्र डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे तसेच त्यांची कुटुंबीय हीच परंपरा पुढे चालवत आहेत. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांना हेमलकसा येथील आदिवासी भागातील कार्यासाठी २००८ साली मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हे ही वाचा : मेकअप कलेचे दादा :पंढरीदादा legendary makeup artist of Bollywood

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now