यंदाची होळी नेमकी कोणत्या दिवशी? चंद्रग्रहण काळात धुळवड रंगोत्सव साजरा करायचा की नाही ? असा संभ्रम लोकांमधे निर्माण झाला होता . प्रसिद्ध पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी TV 9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर आपले मत प्रदर्शित केले आहे.
धर्मसिंधु ग्रंथाचा हवाला
धर्मसिंधु ग्रंथाचा हवाला देत दा. कृ. सोमण यांनी सोमवारी 2 मार्च 2026 रोजी सूर्यास्ता नंतर होलिका दहन व मंगळवारी 3 मार्च रोजी सूर्योदयानंतर धुलीवंदन साजरे करा असे म्हणत होलिकोत्सव तिथी च्या संभ्रमावर पडदा टाकला आहे..
सोमवारी 2 मार्च रोजी सायंकाळी 5:56 पासून फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे. या दिवशी प्रदोष काळी फाल्गुन पौर्णिमा आहे व या दिवशी होलिका दहन करणे पंचांगानुसार योग्य ठरेल असे श्री. दा. कृ. सोमण म्हणाले आहेत.
3 मार्च 2026 या दुसऱ्या दिवशी प्रदोष काळी फाल्गुन पौर्णिमा नाही.
तसेच मंगळवारी 3 मार्च रोजी सुर्योदया पासून चंद्र ग्रहण असले व चंद्रग्रहणाचा वेध सुर्योदयापासून सुरू होत असला तरी या दिवशी रंगोत्सव साजरा करण्यात पंचांग शास्त्रानुसार काहीच अडचण नाही असे त्यांनी स्पष्ट केले.







