सांगलीच्या गोठखिंडी गावात 1961 पासून मशिदीमध्ये गणपती बसवला जातो.
1961 साली पुण्यातील पानशेत धरण फुटले होते. त्यामुळे सर्वत्र प्रचंड पूर आला होता. यावर्षी प्रथमच सांगलीच्या गोठखिंडी गावात गणपती बसवण्यात आला होता. धरण फुटीच्या दुर्दैवी घटनेमुळे हाहाकार माजला होता. पुराचे पाणी गावात घुसले होते. या परिस्थितीत गावातील गणपती पाण्यात भिजू लागला हे पाहून निजाम पठाण या मुस्लिम गावकऱ्याने गणपतीला मशिदीत बसवावे असे गावकऱ्यांना सुचवले व त्याप्रमाणे गणेश मूर्ती ला पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी मशिदीत हलविण्यात आले. या घटनेनंतर पुढे हीच प्रथा सर्व गावकऱ्यांच्या विचाराने कायम ठेवण्यात आली.
काही वर्षे गणेश उत्सव बंद पण १९८० पासून उत्सव पुन्हा सुरू
मधली काही वर्षं गावात गणपतीच बसवला गेला नाही . पण 1980 साला पासून गावकऱ्यांनी पुन्हा एकदा गणेशोत्सव सुरू करण्याचे ठरवले. पूर्वीप्रमाणेच गणपती मशिदीतच बसवायचा असा गावकऱ्यांनी निर्णय घेतला. तेव्हापासून गोठखिंडी च्या न्यू गणेश कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळा तर्फे गेली 45 वर्ष सातत्याने हा गणेश उत्सव साजरा होत आहे व गोठखिंडी गावच्या मशीदीत गणेश प्रतिमेची स्थापना होत आहे. गावातील मुस्लिम समाज गणेश उत्सवाच्या सर्व विधी व सोपस्कारांमधे आनंदाने सहभागी होत असतो.
धार्मिक सलोखा जपणारे गोठखिंडी गाव
गोठखिंडी गावात पूर्वीपासून धार्मिक सलोखा आहे. एकमेकांच्या सणात इथले हिंदू मुस्लिम सहभागी होत असतात. यावर्षी ५ सप्टेंबर २०२५ रोजी गणेशोत्सव काळातच मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद सण आहे. असे असले तरी इथल्या मुस्लिम समाजाने गणेश विसर्जनापर्यंत म्हणजे ६ सप्टेंबर पर्यंत कुठलीही कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षीही अशाच प्रकारे मुस्लिम बांधवांनी गणेश उत्सव काळात ईद ची कुर्बानी टाळली होती.
पुरामुळे धार्मिक श्रद्धांचा संगम
एकमेकांच्या सणांचा व धार्मिक भावनांचा आदर करत या गावचे हिंदू मुस्लिम एकोप्याने राहत आहेत. 1961 साली पानशेत धरणाच्या फुटलेल्या बांधानी गोठखिंडी गावच्या हिंदू-मुस्लीमांच्या धार्मिक श्रद्धांचा अनोखा संगम घडवून आणला आहे.ही प्रथा यापुढेही अशीच चालवली जाईल असे न्यू गणेश कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळा चे सदस्य निर्धाराने सांगतात.







