
शंभर एक वर्षांपूर्वी एक मराठी मुलगी हिटलर च्या अमानवीय वंशवादी सिद्धांताला त्याच्याच जर्मनी देशात वैज्ञानिक संशोधनातून खोटे ठरवते ही बाब मराठी समाजासाठी अभिमानास्पद व प्रेरणादायीच आहे.
जन्म एका दूरदेशात म्यानमार येथे
इरावती कर्वे यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ रोजी ब्रिटीश बर्मा (आताचा म्यानमार) या परदेशात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव गणेश हरी करमरकर. इरावती यांच्या आई-वडिलांनी म्यानमार ची प्रसिद्ध नदी इरावदी वरून इरावती यांचे हे नाव ठेवले.गणेश हरी करमरकर त्या काळी ब्रिटिश भारत सरकारच्या सेवेत वरिष्ठ पदावर कार्यरत होते, त्यामुळे संपूर्ण कुटुंब बर्मात स्थायिक झालं होतं.अगदी लहान वयातच इरावती बौद्धिकदृष्ट्या अत्यंत जिज्ञासू होत्या. बालपणीच विविध संस्कृती, वेगवेगळे लोक, आणि विविध भाषा यांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला.काही वर्षांत त्यांच्या वडिलांची बदली भारतात झाली आणि संपूर्ण कुटुंब पुण्यात परत आलं.
शैक्षणिक प्रवास: पुणे-मुंबई ते थेट जर्मनी
पुणे तेव्हा भारतीय नवजागरणाचं, शिक्षणाचं आणि सुधारक चळवळीचं केंद्र होतं. इथं येऊन इरावतींच्या व्यक्तिमत्त्वाला खरी दिशा मिळाली. इरावतीला घरात लाडाने ‘इरू’ म्हणत. छोटी इरू पुण्याच्या हुजूरपागा येथील कन्या शाळेत शालेय शिक्षण घेवून लागली. पुढे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून त्यांनी आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं.यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्रात पुढील शिक्षण घेतलं.मात्र, इरावतींचं आकलन इतकं तीव्र होतं की त्यांना केवळ स्थानिक शिक्षण पुरेसं वाटलं नाही. त्यांनी ठरवलं — उच्च शिक्षणासाठी जर्मनी ला जावं.
इरावतींचे एव्हाना लग्न झाले होते. पती श्री दिनकर धोंडो कर्वे याआधीच जर्मनीत रसायन शास्त्र विषयातील उच्च शिक्षण घेवून परतले होते. त्यांच्या पाठिंब्याने व मार्गदर्शनाने इरावतीने मुंबई येथून समुद्री जहाजाने प्रवास करत जर्मनी गाठले.त्या काळी भारतीय महिलेने परदेशात शिक्षणासाठी जाणं ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट होती.
जर्मनीतला वैज्ञानिक लढा : Racial Supremacy ला आपल्या शोध प्रबंधात नाकारले
जर्मनीत इरावती कर्वे यांनी Professor Eugen Fischer यांच्या मार्गदर्शनाखाली मानववंशशास्त्राचा अभ्यास सुरू केला. मात्र इथे एक मोठं आव्हान त्यांच्या पुढे होतं — युजिन फिशर हे त्या काळच्या वर्णवर्चस्ववादी विचारसरणीचे (Racial Supremacy) समर्थक होते. अद्याप हिटलर चा उदय झाला नव्हता पण हिटलरचा नाझी पक्ष एक मजबूत विरोधीपक्ष म्हणून मान्यता पावत होता.
Racial Supremacy हा मूलभूत विचार हिटलर च्या पक्षाने अंगिकारला होता व इरावती कर्वे यांचे गाईड प्रोफेसर फिशर हिटलरच्या पक्षाचे सदस्य होते.
त्यावेळी जर्मनीतील काही तथाकथित “वैज्ञानिकांनी” मोजकेच संशोधन केले व ते political agenda नुसार नाझी धोरणांना पाठिंबा देणारे असेच निष्कर्ष देत असत.अशा संशोधनांना आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायाकडून मान्यता मिळाली नव्हती आणि नंतरच्या काळात त्यांना अवैज्ञानिक आणि पक्षपाती ठरवलं गेलं
काय होती हिटलरची Racial Supremacy ची कल्पना?
हिटलर ची Racial Supremacy ची संकल्पना विशिष्ट समाजाच्या शारिरीक रचने चा तुलनात्मक अभ्यास करून मांडली गेली होती. त्वचेचा रंग , डोळ्यांचा रंग अशा ढोबळ बाह्य शारिरीक लक्षणांवरून एका समाजाला pure व श्रेष्ठ मानले गेले होते. विशेषतः मानवीय कवटीच्या बाह्य आकारावरून , जसे की पुढील बाजूस वंशानुरूप मोठी कवटी असणारा युरोपीय समाज हा जास्त तर्कशुद्ध व ज्ञानी होता असे या तत्वानुसार गृहित धरले गेले होते.मेंदूची आतील neurologist रचनेचा अभ्यास न करता केवळ बाह्य कवटी च्या अभ्यासा( Craniotomy) वरून समाजाची गुणवत्ता मांडणारी ही एक फोल संकल्पना होती.
इरावती कर्वे यांचा वंशशास्त्रा वरील जर्मन विद्यापीठातील प्रबंध व प्रोफेसर फिशर यांच्याशी मतभेद
इरावती कर्वे यांनी जेंव्हा जर्मन विद्यापीठात आपल्या शोध प्रबंधावर काम सुरू केले तेंव्हा प्रोफेसर युजिन फिशर त्यांचे गाईड होते. फिशर यांनी इरावती कर्वे यांना आपल्या प्रबंधातून Racial Supremacy तत्वांची पुष्टी करणारे निष्कर्ष लिहावेत , विशेषतः मानवी कवटीच्या आकाराचा तुलनात्मक अभ्यास करून हे निष्कर्ष लिहावेत अशी सूचना केली होती.
इरावती कर्वे यांनी सखोलपणे हा अभ्यास केला पण कवटीच्या बाह्य आकारावरून मेंदू च्या बुद्धिमत्ता व तर्कशीलतेच्या क्षमतेचे अनुमान काढणे अवैज्ञानिक ठरेल हे त्यांच्या लक्षात आले व तसेच मत त्यांनी आपल्या शोध प्रबंधात लीहिले. प्रोफेसर फिशर यांना इरावती कर्वे यांची ही भूमिका आवडली नाही जी त्यांच्या Racial Supremacy तत्वाविरूद्ध जात होती. प्रोफेसर फिशर यांनी या कारणास्तव इरावती कर्वे यांच्या या प्रबंधाला कमीत कमी गुणांक दिले पण इरावती कर्वे आपल्या मतांवर शेवटपर्यंत ठाम राहिल्या .नाझी विचारधारेचं बीज रोवणाऱ्या या वातावरणात, खुद्द जर्मनीत इरावती कर्वे यांनी धैर्याने आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून व अभ्यास नोंदीतून आवाज उठवला होता.
त्यांनी आपल्या संशोधनातून स्पष्ट केलं की,
• वंशाच्या नावावर श्रेष्ठता ठरवणं वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचं आहे.
• मानवी समाजांमध्ये आढळणारी विविधता ही नैसर्गिक उत्क्रांतीचा भाग आहे, यावरून वंश किंवा र्वण वर्चस्व निश्चित करता येत नाही.
• शरीररचना, रंग, किंवा जातीने माणसाची योग्यता ठरत नाही.
या विचारांमुळे त्या केवळ उत्कृष्ट शास्त्रज्ञ ठरल्या नाहीत, तर एक विचारवंत सत्यधर्मी विदूषी म्हणून ख्याती पावल्या.
भारतात परतल्यावर
जर्मनीत आपले शिक्षण पूर्ण करून इरावती भारतात परतल्या. त्यांचं लक्ष केवळ सिद्धांत मांडणे नव्हते, तर भारतीय समाजाच्या मुळाशी असलेल्या विविधतेचा शास्त्रीय अभ्यास करण्याचे होते. भारतात त्यांनी देशभर भ्रमंती केली — आदिवासी समूह, प्राचीन मानव वसाहती, सामाजिक रचना — याचा सखोल अभ्यास केला.त्यांचा दृष्टिकोन असा होता की,
“इतिहास आणि समाज ही एकमेकांना गुंफून ठेवणारी जीवनव्यवस्था आहे. फक्त भूतकाळ नव्हे, वर्तमान देखील नैसर्गिक उत्क्रांती च्या प्रभावाखाली घडत असतो”
इरावती कर्वे यांचा जर्मनीतील शैक्षणिक कार्यकाल व हिटलरची राजकीय वाटचाल : एक समांतर प्रवास
इरावती कर्वे यांचा जर्मनीतील कार्यकाल
• इरावती कर्वे यांनी १९२०च्या दशकाच्या उत्तरार्धात जर्मनीमध्ये मानववंशशास्त्र (Anthropology) शिकण्यासाठी प्रवेश घेतला.
• त्या Eugen Fischer या प्रसिद्ध (पण वादग्रस्त) मानववंशशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली बर्लिनमधील विद्यापीठात संशोधन करत होत्या.
• Fischer हा व्यक्ती शुद्ध वंशवाद (racial purity) या विचारांचा पुरस्कर्ता होता, आणि नंतर नाझी विचारसरणीचा एक शास्त्रीय समर्थक बनला.
त्या काळातील जर्मनीचे राजकीय वातावरण
• १९२०च्या दशकात जर्मनीमध्ये पहिल्या महायुद्धानंतरची पराभूत समाज मानसिकता, सूड भावना व आर्थिक अस्थिरता होती.
• वर्साय करारामुळे (Treaty of Versailles) जर्मनीवर फार मोठे अपमानकारक निर्बंध व अटी लादल्या गेल्या होत्या ज्यामुळे जर्मनी चे आर्थिक नुकसान झाले होते, त्यामुळे जर्मन लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता.
• या काळात हिटलर आणि त्याचा पक्ष नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी (नाझी पार्टी) हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले.
साल अनुक्रमे : इरावती कर्वेंचे शिक्षणासाठी जर्मनी मधे पोहोचणे व त्याच दरम्यान हिटलरचा जर्मनीत उदय
१९२४ हिटलरची जेलमधून सुटका (१९२४ नंतर त्याचे पक्ष पुनर्गठन कार्य)
११९२७-२८ इरावती कर्वे जर्मनीत शिक्षणासाठी पोचल्या.
१९२८ इरावती कर्वे यांनी जर्मनी मधे मानववंशशास्त्राचा गाढा अभ्यास सुरू केला. याच वर्षी हिटलर च्या नाझी पार्टीने Reichstag (जर्मन संसद) मध्ये पहिल्या काही जागा मिळवल्या.
१९२९ साली इरावती कर्वे जर्मनीतल्या सामाजिक-वांशिक रचनेचा अभ्यास करत होत्या. हा जगातील आर्थिक महामंदी (Great Depression) चा काळ होता. लोकांमध्ये नैराश्य वाढलं होतं.
१९३० जर्मनीत वांशिक सिद्धांतांचा अर्थात Racial Supremacy तत्वाचा जोर वाढत होता. हिटलर ची नाझी पार्टी आता मोठी विरोधी पार्टी बनली. याच वेळी इरावती कर्वे यांनी आपला प्रबंध प्रोफेसर फिशर यांना सादर केला ज्यात Racial Supremacy ला त्यांनी अवैज्ञानिक ठरविले होते
१९३१-३२ इरावती कर्वे भारतात परतण्याच्या तयारीत होत्या. यावेळी हिटलरला जर्मनी मधे मोठं लोकसमर्थन मिळू लागलं होतं. पुढे १९३३ मध्ये तो चान्सलर झाला.

कशी तफावत होती इरावती कर्वे आणि त्या काळाच्या जर्मन नाझी विचारसरणीमध्ये?
• इरावती कर्वे यांनी जर्मनीत असताना अनुभवले की “वंश” (Race) या संकल्पनेचा “अतिरेकी राजकीय गैरवापर” शास्त्रज्ञ आणि राजकीय नेते करत आहेत.
• तिथे वंशाच्या आधारावर माणसांच्या मूल्यांकनाला वैज्ञानिक बळ दिलं जात होतं, जे त्यांना मान्य नव्हतं.
• Fischer सारख्या प्राध्यापकांकडूनही “आर्य वंश श्रेष्ठ” अशी मांडणी केली जात होती, आणि हीच नंतर नाझी विचारसरणीचा मूलभूत पाया झाला.( जर्मन नागरिक मूळ आर्य आहेत असे हिटलर चे म्हणने होते)
• इरावती कर्वे यांनी मात्र स्पष्टपणे सांगितले की,
“वंशविज्ञानातून मानवी श्रेष्ठता सिद्ध करणे हा विज्ञानाचा अपमान आहे. मानवाची उत्क्रांती ही संमिश्रतेत आहे, शुद्धतेत नव्हे.”
यामुळेच त्यांचा अभ्यास दृष्टिकोन “विज्ञानाधिष्ठित” (scientific) राहिला, आणि त्यांनी वंशभेद, वंशवाद यांचा निषेध केला.
हिटलर व इरावती कर्वे: समांतर प्रवास थोडक्यात
इरावती कर्वे जर्मनीत शिकत असताना हिटलर हळूहळू सत्तेच्या शिखरावर चढत होता.
• ज्या विद्यापीठात त्या होत्या, तिथल्याच काही तज्ज्ञांनी (जसे की Fischer) नाझी विचारसरणीला वैज्ञानिक समर्थन पुरवले.
• पण इरावती कर्वे यांचा दृष्टिकोन मोकळा, वैज्ञानिक आणि मानवी एकतेवर आधारित होता — म्हणूनच त्या तिथल्या प्रवाहाविरुद्ध उभ्या राहिल्या.
• त्यामुळे इरावती कर्वे यांचा “बौद्धिक संघर्ष” हा फक्त अकादमिक नव्हता, तर तो त्या काळच्या जागतिक राजकीय प्रवाहाविरुद्धही होता.
साहित्य आणि बौद्धिक योगदान
इरावती कर्वे यांनी अनेक शोधनिबंध आणि ग्रंथ लिहिले. त्यांच्या काही विशेष प्रसिद्ध साहित्यकृती खालील प्रमाणे:
• “युगांत” — महाभारतातील पात्रांचा आधुनिक दृष्टिकोनातून अभ्यास. (हा ग्रंथ विशेष गाजला.)
• “किन्ही लोक” — मानववंशशास्त्रीय निरीक्षणे.
• “महाराष्ट्राची संस्कृती” — मराठी संस्कृतीचा शास्त्रीय अभ्यास.
• “परिपूर्ती”, “हिंदी समाजाची रचना” इत्यादी.
“युगांत” या पुस्तकात त्यांनी महाभारतकालीन व्यक्तीरेखांमध्ये मानवी भावभावनांचा, संघर्षांचा आणि निर्णयशक्तीचा अभ्यास अत्यंत संवेदनशीलतेने मांडला आहे.या ग्रंथासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला.
व्यक्तिगत आयुष्य :
स्वतंत्र विचारांची मूर्तिमंत प्रतिमाइरावती कर्वे यांनी सामाजिक रूढींना कधीही बंधन मानलं नाही
• त्या स्कूटर चालवत असत,
• बेदिंग सूटमध्ये पोहत असत,
• आणि त्यांनी विरोध डावलून आपल्या पसंतीच्या योग्य व समाजभान असलेल्या पुरुषाशीच विवाह केला.
त्या शिक्षिका म्हणूनही विद्यार्थ्यांना केवळ माहिती देत नसत, तर त्यांना विचार करायला शिकवत. त्यांचं म्हणणं होतं,
“समाज समजून घ्यायचा असेल तर त्याच्या रचना, त्याचे संघर्ष, आणि त्याचे काळानुरप बदलणारे अर्थ समजून घ्या.”
अखेरची यात्रा
१९७० च्या दशकात त्या वाढत्या वयोमानानुसार आजारपणामुळे त्यांचे कार्य काहीसे मंदावले .११ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचं निधन झालं.मात्र त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रकाश आजही समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि मराठी साहित्याच्या आकाशात तेजाने चमकत आहे.
निष्कर्ष
इरावती कर्वे यांचा जीवनप्रवास हा एका लढवय्या बुद्धिमत्तेचा प्रवास आहे. म्यानमारमध्ये जन्मलेली ही मराठी मुलगी पुढे पुण्यात वाढली. मुंबई व थेट जर्मन विद्यापीठात संशोधन करून भारतीय समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राच्या क्षेत्रात दीपस्तंभ झाली.

हे ही वाचा
चार्ली चॅपलीन यांना आवडला होता मराठी चित्रपट ‘माणुस’
येशू ख्रिस्त भारतात आले होते का?








Khup mahitipurna lekh ahe.
धन्यवाद
अतिशय अभ्यासपूर्ण लेख, सुंदर मांडणी.
धन्यवाद