शिव चरित्रातील ‘छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका’ या महानाट्याला पुरंदरच्या तहाची पार्श्वभूमी होती
पुरंदरचा तह शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक मोठी पिछाडी होती. याच तहाच्या अटीनुसार महाराजांनी औरंगजेबाच्या वाढदिवस सोहळ्यास उपस्थित राहण्याचे कबूल केले. औरंगजेबातर्फे त्यांना अफगाणिस्तान मोहमेवर पाठववण्याची शक्यता होती. महाराजांना मात्र कर्नाटक प्रांतातील चौथ वसुलीचे अधिकार हवे होते.
आग्र्यास प्रयाण
5 मार्च 1666 रोजी शिवाजी महाराज 9 वर्षांच्या शंभूराजेंना आपल्या सोबत घेऊन आग्र्यास निघाले. औरंगजेबाने महाराजांना आपल्या तर्फे एक लाख रुपये प्रवास खर्च व सोहळ्यासाठी ‘खिल्लत’ हा शाही पोशाख पाठवला होता.
दोन महिन्यांच्या प्रवासानंतर अंदाजे 1200 km अंतर पार करून, 9 में 1666 रोजी शिवाजी महाराज आग्र्याजवळ पोहोचले. दुय्यम दर्जाचे अधिकारी रामसिंग यांनी मुखारीस खान यांच्यासोबत महाराजांचे स्वागत केले.
औरंगजेबाच्या वाढदिवस सोहळ्यातील अपमान नाट्य आणि तद्नंतर नजर कैद
ठरल्याप्रमाणे 12 मे 1666 रोजी औरंगजेबाच्या दिवाने आम मधे त्याच्या जन्मदिन सोहळ्यास महाराज शंभूराजेंसह उपस्थित राहिले . भेटी प्रित्यर्थ महाराजांनी औरंगजेबास दोन हजार सुवर्ण मोहरा व 6000 रुपये नजराना दिला.शाही दरबाराच्या नियमानुसार महाराजांनी औरंगजेबास तीन वेळा कुर्निसात केला पणऔरंगजेबाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. महाराजांना औरंगजेबा कडून कुठला ही नजराणा देण्यात आला नाही.. तद्नंतर रामसिंग याने शिवाजी महाराजांना दरबारात अतिशय मागे असलेल्या पाच हजारी मनसबदारांच्या रांगेत उभे केले. त्या जागेवर औरंगजेब महाराजांना दिसत ही नव्हता. महाराजांचा पारा आता चढला होता. दरबाराची शांतता भंग करत त्यांचा आवाज घुमला “ माझा नऊ वर्षाचा मुलगा आणि माझे नोकर देखिल पाच हजारी मनसबदार आहेत!”
औरंगजेबाने रामसिंहला बोलावून “काय झाले?” असे विचारले. यावर “जंगलातला वाघ आहे हुजूर.. इथला उन्हाळा त्याला सहन नाही झाला!” … असे उत्तर रामसिंग ने दिले.
शिवाजी महाराज तीन महिने औरंगजेबाच्या नजरकैदेत
अखेर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजरकैद केले. कैदेत असताना शिवाजी महाराजांनी अतिशय चलाखीने औरंगजेबाशी सहकार्याचा दिखावा करत 17 August 1666 रोजी छोटे संभाजी व हिरोजी फर्जंद यांच्या सोबत औरंगजेबाच्या कैदेतूनपलायन केले. (*सदर घटनेच्या 22 July व 19 August अशा दोन वेगवेगळ्या तारखा ही काही दस्तावेज सांगतात)
आग्र्यात पहिल्याच चौकीवर लातीफ खान तैनात होता. वेशांतर केलेल्या शिवाजी महाराजांनी लातीफ खानला ‘मीरबक्ष मोहम्मद आमिर खान’ नावाचा खोटा दस्तावेज दाखवून चौकी पार केली.
आग्रा- मथुरा व त्या पुढचा राजगडापर्यंतचा प्रवास कुठल्या मार्गाने?
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या फौजेस चकवण्यासाठी सर्वप्रथम उत्तरेस प्रवास करत मथुरा गाठली. मथुरेत प्रधानमंत्री मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे काशीपंत यांचे कडे छोट्या संभाजींना ठेवून सोबत हिरोजी फर्जंद व दोन सहकारी घेऊन ते दक्षिणेकडे निघाले.
मथुरा ते राजगड प्रवास – एक गुपित
शिवाजी महाराजांनी शेवटपर्यंत मथुरा ते राजगड हा त्यांनी केलेला प्रवास मार्ग गुपित ठेवला कारण याच मार्गाने संभाजी राजे त्यांच्या मागून राजगडाकडे येणार होते. शंभू राजे सुखरूप गडावर पोहोचावे यासाठी ही गुप्तता पाळण्यात आली. शिवाजी महाराजांनी कुठल्या मार्गाने मथुरा ते राजगड हा प्रवास केला हे यामुळेच आजपर्यंत गुपित राहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर पोहोचल्याची तारीख व मतभेद
शिवाजी महाराज राजगडावर पोचल्याबद्दल ज्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये नोंदी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत.
मुघल दरबारातील कागदपत्रे तसेच राजस्थान मधील राजपूत साम्राज्याच्या दप्तरातील कागदपत्रे (बल्लू शहाचे पत्र) यानुसार शिवाजी महाराज 12 सप्टेंबर रोजी राजगडावर पोहोचले. हा प्रवास कालावधी एकूण 25 दिवसांचा होतो.
पावसाळी हवामान पाहता. नद्यांचे पूर, दल-दल यांना ओलांडत 25 दिवसात महाराज मथुरे हून सरळ खाली उतरत खानदेश पार करून राजगड गाठू शकले असतील ही शक्यता धूसर वाटते. तरीही या शक्यता समजावून घेणे महत्त्वाचे आहे.

संभाव्य मार्ग १
मथुरा→चंबळ→मावळ→खानदेश /कींवा (नकाशातील हिरवी लाईन ) राजस्थान→गुजरात→कोकण
असा असू शकत होता. पण हा मार्ग महाराजांसाठी जोखमीचा होता कारण हा संपूर्ण मार्ग औरंगजेबाच्या सत्तेतून जात होता. पावलो पावली मुगल सैन्याची ठाणी होती .
या सर्व बाबींमुळे 12 सप्टेंबर ही राजगडावर पोहोचल्याची तारीख व खानदेश मार्ग या दोन्ही बाबी इतिहासकार मेहंदळे वगळता इतर इतिहासकार तर्कशुद्ध मानत नाहीत. हा मार्ग महाराजांनी वापरला नसणार यांचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे दोनच वर्षांपूर्वी त्यांनी केलेली सुरतेची लूट. या घटनेनंतर गुजरात प्रांतात मुघल चौक्या अतिदक्षता बाळगून होत्या.
२५ दिवसांत आग्रा ते राजगड?
शिवाजी महाराजांचा मार्ग सुकर करण्यासाठी कदाचित ते आधीच राजगडावर पोहोचले अशी आवई मराठयांकडून उठवली गेल्याची शक्यता ही बोलली जाते.
राजा जयसिंग यांनी ही औरंगजेबास पाठवलेल्या एका पत्रात शिवाजी महाराज 27 सप्टेंबर 1666 पर्यंत राजगडावर पोहोचलेच नाहीत असे लिहिले आहे.
मराठा दस्तावेजातील राजगडावर पोहोचल्याची तारीख
भोर जवळील जेधे संस्थानात मुघलकालातील घटनांच्या नोंदी केलेल्या आढळतात. याला जेधे शकावली म्हणतात. या जेधे शकावली अनुसार शिवाजी महाराज राजगडावर 20 नोव्हेंबर 1666 रोजी पोहोचले.
संभाव्य मार्ग २)
मथुरा→ अलाहबाद→ गोंडवाना→ गोलकोंडा→ विजापूर→सोलापूर→ पंढरपूर→राजगड ( नकाशातील निळी रेषा)
इतिहासकार यदुनाथ सरकार सुद्धा याच मार्गाची शक्यता सांगतात.
या दुसर्या संभाव्य मार्गालाही पहिल्या मार्गाच्या सर्व अडचणी व आव्हाने लागू होतात.
संभाव्य मार्ग ३)
अलाहाबाद कडून खाली न उतरता पूवेकडे जात पूरी →जगन्नाथ →दक्षिण- असा लांबचा वळसा घेत खाली जाणारा मार्ग (नकाशातील पिवळी रेषा)
महाराजांनी हा लांबचा मार्ग वापरल्याची शक्यता काही इतिहासकारांना जास्त वाटते कारण हा कमी जोखमीचा मार्ग होता
मार्ग – मथुरा→अलाहबाद→बनारस→ गया→ पुरी→ बस्तर→ गोंडवाना→ गोवळकोंडा→ विजापूर→
सोलापूर→ पंढरपूर→ राजगड
हे अंतर इतर मार्गांपेक्षा दुप्पट होते व ते कापण्यास महाराजांना 50 ते 60 दिवस लागले असा एक तर्क आहे व तो जेधे शकावलीच्या 20 नोव्हेंबर या तारखेस सुसंगत वाटतो.
हा प्रवास तीन ते साडेतीन हजार किलोमीटरचा आहे.
महाराजांनी रोज पाच ते सहा तास घोडेस्वारी केली असणार.
रोज सात ते दहा किलोमीटर अंतर पार करत महाराज 40 ते 50 दिवसात राजगडावर पोचले असणार असे अनुमान यावरून काढता येते.
शिवाजी महाराजांची असीम क्षमता ही प्रेरणादायी
आ्ग्रा चौकीवरचा लातीफ खान औरंगजेबाच्या पायावर पडून “सिवाजी हवा हो गया?” असं म्हणाला होता. लाल महालातील हल्ल्यानंतर शाहिस्तेखानानेही औरंगजेबास लिहिलेल्या पत्रात महाराजांकडे अद्भुत शक्ती आहे असे म्हटले होते. दुश्मनाला शह देण्यासाठीच महाराज जी मती गुंग करणारी तडफ दाखवित ती अविश्वसनीय होती. अशक्य गोष्टींना शक्य करण्याची धमक व कुवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधे होती.हे पाहता वरील कुठल्या ही मार्गाने ते मथुरे हून राजगडावर येवू शकत होते असे म्हणता येईल. असे असले तरी तर्कशुद्ध विचाराने ऐतिहासिक कथा ‘तथ्य पूर्ण’ होतात व इतिहास या तथ्याच्या पायावर आणखीनच खरा व प्रेरणादायी होतो.
हे ही वाचा : छत्रपती शाहू महाराज |कोल्हापूर चे आणि सातारचे | मराठा साम्राज्याच्या दोन गाद्या का? || ‘देव शोधा !’-राजमाता जिजाऊंनी आदेश दिला होता- कसा सापडला स्वयंभू कसबा गणपती- पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीचा इतिहास.. || Great Maratha Mahadji Shinde birth place Shrigonda || चिमाजी अप्पा : वसई किल्ल्यावर क्रांतीचा घंटानाद आणि शांतीचा घंटारव








1 thought on “छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका : 1200 km अंतर फक्त 26 दिवसांत महाराजांनी कसे पार केले? जाणून घ्या त्या गुप्त मार्गाच्या 3 शक्यता”