कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. कसबा गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे. ही ‘तांदळा’ पद्धतीची विशिष्ट अशी मूर्ती कशी सापडली याचा इतिहास जाणून घेणे अगत्याचे आहे कारण या इतिहासाशी थेट शिवाजी महाराजांच्या बालपणाचा अध्याय जोडला आहे..
कसबा गणपती राजमाता जिजाबाई यांनी स्थापन केला होता .पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीचा इतिहास
मराठा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा – Kasba Ganapati Pune History
राजमाता जिजाबाई आणि लहानगे शिवाजी यांचे पुण्यात आगमन हा मराठा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
इ.स. 1636 मध्ये, अंदाजे सात वर्षांचे शिवाजी आपल्या आई जिजाबाईंसोबत पुण्यात आले. त्यापूर्वी ते काही वर्षे विजापूर येथे आपले वडील शहाजी राजें सोबत राहत होते. शहाजीराजे भोसले आदिलशाही मधे सर लष्कर ( Major general) या महत्वपूर्ण पदावर होते . याच वेळी पुणे भागात( पुणे,सुपे ,चाकण)त्यांनी आपली स्वतःची जहागीर स्थापन केली होती.
राजमाता जिजाऊ व शिवाजीराजे यांना पुनवडी (आत्ताचे पुणे शहर) येथे पाठविण्याचा शहाजीराजेंनी मुत्सद्दी विचार केला होता. स्वराज्याचा पायंडा घालणे, स्वतःच्या जहागीरीची व्यवस्था लावणे याचबरोबर लहान शिवाजीचे भवितव्य उज्ज्वल करणे आणि कुटुंबासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही कारणे त्यामागे होती. जिजाबाई आणि लहान शिवाजी पुण्यास आले तेंव्हा पुणे हे पुणवडी नावाचे एक छोटेसे गाव होते. इथेच शहाजींनी जिजाऊ आणि शिवबा साठी लालमहाल बांधला होता.
कसबा गणपती: राजमाता जिजाबाईंना दिव्य साक्षात्कार
पुण्यात आल्यानंतर जिजाबाईंना एका दिव्य अनुभवाचा साक्षात्कार झाला. त्यांना आणि एका गणेशभक्त ठकार कुटुंबाला एकाच वेळी स्वप्नादेश झाला, ज्यात जमिनीत पुरलेली एक गणपती मूर्ती असल्याचे सांगितले गेले. जिजाबाईंनी ताबडतोब “देव शोधा!” असा आदेश दिला आणि जहागिरीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे परिसरात तातडीने शोधमोहीम हाती घेतली.
थोड्याच अवधीत, सध्याच्या कसबा पेठ परिसरात खणल्या गेलेल्या जमिनीतून एक अद्भुत स्वयंभू गणपती मूर्ती प्रकट झाली. ही मूर्ती ‘तांदळा’ स्वरूपात होती, म्हणजेच ती संपूर्ण शरीर चित्रित न करणारी फक्त मुख दर्शन देणारी मूर्ती होती . पुण्यात अशा प्रकारची ही एकमेव मूर्ती आहे.(Kasba Ganapati Pune History)
श्री कसबा गणपती मंदिराची स्थापना
कसबा पेठ परिसरात भू-खणनातून सापडलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी जिजाबाईंनी तेथेच एक मंदिर बांधण्याचे आदेश दिले. अशाप्रकारे इ.स. 1637-38 च्या सुमारास पुण्याच्या कसबा पेठ परिसरात लाल महालाच्या अगदी जवळ ‘श्री कसबा गणपती मंदिर’ अस्तित्वात आले. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मण कुटुंबांपैकी ठकार कुटुंबाने या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली आहे.
कसबा गणपतीचे वैशिष्ट्य आणि महत्त्व
ग्रामदैवताची मूर्ती:
कसबा गणपती हा पुणे शहराची ग्रामदेवता (ग्रामदैवत) म्हणून ओळखला जातो आणि पुण्यातील सर्वात जेष्ठ असा मानाचा गणपती मानला जातो. या गणपतीची मूर्ती ही तांदळा स्वरूपात आहे ज्यात सपाट दगडी पृष्ठभागावर श्री गणेशाचे रूप स्वयंभू पद्धतीने आकारास आल्याचे दिसते. अनेक वर्षांपासून या मूर्तीवर सातत्याने शेंदूर लेपण झाल्याने या मूर्तीचे मूळ रूप शेंदूर लेपांच्या थराखाली लपले गेले होते.. नुकतेच कसबा गणपतीच्या मूर्तीवरील हा थर विश्वस्त मंडळाच्या निर्णयाने काढण्यात आला.
डिसेंबर २०२५ मधे प्रथमच मूर्तीवरील शेंदूर लेपा चा थर काढण्यात आला
१५ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या काळात कसबा गणपती मंदिराचे विश्वस्त बाजीराव ठकार यांनी तज्ञाच्या मदतीने प्रथमच
कसबा गणपती मूर्ति वरील शेंदूर लेपाचा थर काढला होता. हा थर काढणे आवश्यक झाले होते कारण या थरामुळे मूर्ति ला धोका होता. मूर्तीवरील शेंदूर थर काढल्यामुळे प्रथमच मूर्तीचे मूळ रूप भाविकांना पहायला मिळाले. ३१ डिसेंबर २०२५ ला मूळ मूर्ती चे रूप पाहण्यासाठी कसबा गणपती मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. (खालील Dec 2025 फोटो सौजन्य: bol bhidu.com

मंदीर

कसबा गणपती मंदिर हे एक छोटेखानी पण सुबक दोन मजली असे मंदिर आहे. संपूर्ण मंदिर सागवानी लाकडाचे आहे व त्यावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. वरील मजल्यावर जाण्यास भाविकांना मज्जाव आहे. गर्भगृहाकडे जाताना दोन्ही बाजूंस छोटे कक्ष आहेत. गर्भगृहासमोर अंदाजे १५×१० चौरस फुटांचे छोटेखानी सभागृह आहे जिथे भाविक बसू शकतात. गर्भगृह व सभागृहाच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग ठेवला आहे. या प्रदक्षिणा मार्गाच्या भिंतीवर fresco पद्धतीने शिवकालीन प्रसंग चित्रित केलेले दिसतात. संपूर्ण मंदिर ८०% सागवानी लाकडाचे असल्याने या मंदिराला एक वेगळा उबदारपणा व शांती आहे.
शिवाजी महाराजांची श्रद्धा:
ऐतिहासिक संदर्भानुसार, छत्रपती शिवाजी महाराज युद्ध मोहिमेवर निघण्यापूर्वी कसबा गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणूनच या गणपतीला ‘जयति गणपति’ असेही संबोधले . जयती म्हणजे विजय देणारी देवता. पुरंदर तहानंतरच्या आग्र्याहून सुटके चा प्रसंग म्हणजे पराभवातूनही मुसंडी मारत विजयाकडे झेपावण्याचे बळ याच जयती गणेश अर्थात कसबा गणपतीने शिवाजी महाराजांना दिले असणार .
सांस्कृतिक परंपरा:
आजही पुण्यातील लोक कोणतेही मंगल कार्य (विशेषतः लग्न) करण्यापूर्वी येथे पहिली आमंत्रणपत्रिका (अर्पणपत्रिका) ठेवतात आणि कार्य संपल्यानंतर वधू-वराला त्वरित येथे दर्शनासाठी आणले जाते.
सार्वजनिक उत्सवात स्थान: सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा गणपती मंडळाला पुण्याच्या मानाच्या पाच गणपतीं मधे पहिले स्थान आहे. विसर्जन मिरवणुकीत या गणपतीची पालखी अग्रभागी असते.
ऐतिहासिक संदर्भ आणि महत्त्व
जिजाबाईंनी कसबा गणपतीची स्थापना केवळ एक धार्मिक कृती म्हणून केली नाही, तर त्यामागे एक राजकीय आणि सांस्कृतिक संदेशही होता. शहाजीराजे भोसले यांनी पुण्याची जहागीर मिळवल्यानंतर माता जीजाऊंनी आपल्या पतीच्या सत्तेचा प्रभाव वाढविण्यासाठी, तसेच नव्याने वसाहत करणाऱ्या लोकांना एक धार्मिक केंद्र प्रदान करून आश्वस्त भाव निर्माण करण्यासाठी हे कसबा गणपती मंदिर स्थापले होते.
जिजाबाईंची दूरदृष्टी यामध्ये स्पष्टपणे दिसून येते . त्यांनी केवळ एक देवस्थानच स्थापन केले नाही तर पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीचा एक महत्त्वाचा पाया येथे घातला. आजही कसबा गणपती पुण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा भाग बनून आहे.
पुण्याचा सांस्कृतिक वारसा व जीजाऊंची दूरदृष्टी
राजमाता जिजाबाई आणि लहान शिवाजी यांचे पुण्यात आगमन आणि कसबा गणपतीची स्थापना ही केवळ ऐतिहासिक घटना नसून मराठा साम्राज्याच्या उदयाची व विस्ताराची नांदी होती. जिजाबाईंनी केलेले हे कार्य केवळ धार्मिक नसून राजकीयदृष्ट्या देखील महत्त्वाचे होते, ज्याने भविष्यातील स्वराज्य स्थापनेचा मार्ग मोकळा केला. आजही कसबा गणपती मंदिर पुण्याच्या ऐतिहासिक वारस्याचे आणि जिजाबाईंच्या दूरदृष्टीचे एक सजीव स्मारक आहे. ब्रिटिश शासन काळात स्वराज्याची गर्जना याच पुण्यातून लोकमान्य टिळकांनी केली होती. माता जिजाऊंनी स्थापन केलेल्या कसबा पेठेतील गणपतीचा आशीर्वाद यामागे नक्कीच होता.
आपण पुण्यात आल्यास पुण्याच्या या ग्रामदैवताचे दर्शन जरूर घ्या. ज्या मंदिर वास्तूस प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी पदस्पर्श केला व ज्या कसबा गणपती पुढे त्यांनी श्रद्धा सुमने वाहिली त्या कसबा गणपतीचे दर्शन घेणे रोमांचक अनुभूती आहे.
पुणे मेट्रो च्या कसबा पेठ स्थानका पासून हे कसबा गणपती मंदीर खूप जवळ आहे.
FAQ:
कसबा गणपतीला जण्यासाठी जवळचे Metro station कोणते आहे?
कसबा गणपतीला जण्यासाठी जवळचे Metro station हे कसबा पेठ मेट्रो स्टेशन आहे.
कसबा गणपती मंदिराची दर्शन वेळ काय आहे?
कसबा गणपती मंदिराची दर्शन वेळ सकाळी- ६ ते दुपारी १२ व संध्याकाळी -४ ते रात्री १०
माता जिजाऊ व बाल शिवाजी किती साली पुण्यात आले?
माता जिजाऊ व बाल शिवाजी १६३६ साली पुण्यात आले. असे इतिहासकार मानतात
हे ही वाचा:
PCMC ‘सोनेरी दिवस’-2000 साल ची Reel पहिलीत ? Telco Road वरून बसचा सुखद प्रवास..एकदा पहाच

