Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Panch kailash yatra आणि तामिळनाडू मधील 6th Velliyangiri Kailash

हिमालयात पंच कैलाश आणि दक्षिणेत ही आहे एक सहावा कैलाश 

Thumbnail with image of Shiva and Kailash
Thumbnail with images of Shiva and Kailash 

सुप्रसिद्ध कैलाश (मानस सरोवर) पर्वता व्यतिरिक्त भारतात अशी पाच पवित्र पर्वत शिखरे आहेत ज्यांना “कैलाश पर्वत” म्हटले जाते त्यापैकी एक दक्षिणेत तामिळनाडू राज्यात आहे.

प्रत्यक्ष शिवा चे अस्तित्व असणाऱ्या सहा कैलाश पर्वतांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

1) आदि कैलाश (उत्तराखंड ) 5945 मीटर 

आदि कैलाश  पर्वत उत्तराखंड राज्यात कुमाऊ या ठिकाणी  स्थित आहे . या पर्वतास लागूनच ओम पर्वत  हा वैशिष्ट्यपूर्ण पर्वत आहे व या दोन्ही प्रवतांना एकच  पर्वत मानले जाते .  आदि कैलाश पर्वतास छोटा कैलाश असे ही म्हटले जाते कारण आदि कैलाश  हा पर्वत कैलाश पर्वता सारखाच दिसतो . कैलाश मानस सरोवरा पासून फक्त 50 km  अंतरावर आदि कैलाश स्थित आहे . 

पौराणिक कथे अनुसार शिव-पार्वती चा कैलाश मान सरोवरा वरील विवाह सोहळा संपल्या वर हे नव विवाहित जोडपे त्रिगुणी नारायणाच्या दर्शनासाठी निघाले त्यावेळी वाटेत ते आदि कैलाश पर्वतावर थांबले होते . 

आदि कैलाश ला लागूनच असलेल्या  दुसऱ्या  पर्वतास  ‘ओम पर्वत’ ही  म्हटले जाते कारण या पर्वतास  दुरून पाहिल्यास  पर्वताच्या माथ्यावर  साचलेल्या बर्फाने “ओम” हे ब्रम्ह रूपी  पवित्र अक्षर अंकित झालेले आपणास पाहावयास मिळते . हे एक अतिशय दुर्मिळ व विलोभनीय असे दृश्य असते  . भारतीय पौराणिक साहित्या नुसार भारतात असे एकूण आठ पर्वत आहेत ज्यांचावर असे हिमांकित ओम अक्षर उमटलेले पाहावयास मिळते पण  असे जरी असले तरी त्या  उरलेल्या सात प्रवतांचा शोध अद्याप आपल्याला लागलेला नाही . 

जवळील इतर पर्वत शिखरे : 

कुंती पर्वत , पांडव पर्वत , ब्रम्ह पर्वत , पार्वती मुकुट ,  मानस सरोवर ( पार्वती सरोवर )

2) किन्नर  कैलाश  ( हिमाचल प्रदेश )

किन्नर कैलाश हे दुसरे कैलाश शिखर हिमाचल प्रदेश राज्यात कींनोर भागात  आहे. किन्नर  कैलाश शिखरावर  79 फूट उंच अशी   एक उभी प्रचंड शिळा आहे जिचा  आकार उभ्या  सुळक्या समान आहे जो वर टोकदार  होत जातो .  या विशिष्ट आकारामुळे या पर्वत शिलेस शिव लिंग मानले गेले आहे . ही उभी पाषाण  शिला प्रहर बदला सोबत आपला रंग बदलते आणि हे दृश्य मनोहारी असते . सुर्योदया पूर्वी ही शिला शुभ्र असते , सुर्योदया नंतर ती  पिवळी दिसू लागते , सुर्यास्ता नंतर ती लाल दिसते व  रात्री ही शिला काळी दिसते .  मोरंग ते कल्पा या परिक्रमे  च्या वाटेवर हि शिला लागते व  अनेक भाविक तिचे आस्थेने दर्शन करतात. 

पौराणिक मान्यते अनुसार :

  • माता पार्वती चा जन्म या परिसरात झाला आहे व इथेच तिने शिव शंभो ची आराधना केली आहे . 
  • महाभारतातील दाखल्या अनुसार याच पर्वतावर शिवा ने  अर्जुनास  पशुपतासत्र  देवून आशिर्वाद दिला.
  • शिव शंकराने याच पर्वतावर आपले रुद्र-रूप वीर-भद्र स्वरूपात दाखवले होते . 
  • या  किन्नर कैलाश पर्वतावर दर वर्षी  हिवाळ्यात शंकर भगवान देव सभा घेऊन विश्व कल्याना संदर्भात विचार विनिमय करीत असत.

जवळील ठिकाणे : 

बतसेरी गाव , कपला गाव – बुद्धिस्ट आध्यात्म केंद्र , सुसाइड पॉइंट , Tonglin village ( सतलज  नदी काठावरील ) , चिटकुल गाव ( बसपा नदी काठावरील सुंदर गाव जिथे जगातील उत्तम प्रतीचे व महाग बटाटे पिकतात ) 

3) श्रीखंड कैलाश (हिमाचल प्रदेश )

शिव शंकराचे थोरले पुत्र श्री गणेश यांचे हे स्थान आहे . 

श्रीखंड कैलाश पर्वताची यात्रा ही सर्वात कठीण अशी यात्रा आहे  ३२   km  ची ही यात्रा अमरनाथ यात्रेहून ही कठीण मानली जाते .  या पर्वताची ऊंची समुद्र सपाटी पासून   5227 मीटर  एवढी आहे . पायथ्याच्या  जौण गावापासून हा ३२ किलो मीटर चा ट्रेक सुरू होतो .  शिमल्या पासून हे गाव  १७९ किलो मीटर आहे . 

75 फूट उंच व 46 फूट रुंद असे भव्य शिवलिंग येथे पाहावयास मिळते . कितीही बर्फ वृष्टि झाली तरी हे शिव लिंग बर्फा ने  झाकले जात नाही . या शिवलिंगा मध्ये प्रत्यक्ष शिवा चे मुख दर्शन आपणास होते ज्यात शिवाचे डोळे , नाका सकट  जाटाधारी शिव मुख आपणास पाहावयास मिळते . या परिसरात अनेक गूढ गुफा आहेत व शिवा ला अर्पण केलेले सर्व काही या गुफा मध्ये समाविष्ट होऊन जाते . 

श्रीखंड कैलाश संदर्भात काही पौराणिक कथा  :

  • श्री खंड या नावा मागील कथा अशी सांगितली जाते की शिव भक्त रावणाने आपले शीर कापून शिवा ला अर्पण केले ते हे स्थळ आहे व इथेच शिवाने  रावणास  अमरत्वाचा  वर देवून उपकृत केले . 
  • दुसऱ्या कथे अनुसार  राक्षस भीमसार यानेही  शिव भक्ति तून  शिवा कडून असा वर मिळवला की तो ज्या वस्तु वर हात ठेवेल ती वस्तु नष्ट  होईल . या वर प्राप्ती नंतर राक्षस भीमसार याने प्रत्यक्ष शिव पत्नी पार्वती देवी ची अभिलाषा केली . याच अभिलाषे पोटी राक्षस भीमसार याने शिवा ला भस्म करण्याचा अट्टहास केला . अखेर विष्णु  देवाने युक्ति करून  स्वतः  सौन्दर्य वती मोहिनी चे रूप धारण केले व भीमसार याआस स्वतः बरोबर नृत्यात मग्न केले . याच मग्न तेत नृत्य करताना राक्षस भीमसाराने आपला हात स्वतः च्या  डोक्यावर ठेवला व तो तत्काळ मृत्यू पावला  . इथल्या परिसरातील माती व पाणी  याच कारणांमुळे लाल आहे असे समजले जाते .

जवळील ठिकाणे :

भीम द्वारी , पार्वती बगीचा ( इथे पावसाळ्यात ब्रम्ह कमळ उमललेले दिसते जे उत्तरा खंड राज्याचे राज्य फूल आहे . नयन सरोवर ( शिव शंभो आपली ध्यान धारणा सोडत नाहीत या कारणे पत्नी पार्वतीने  आपल्या नयनातून अश्रु ढाळले  ज्यातून हे सरोवर निर्माण झाले.) , भीम की बही ( वही वा हिशेब पुस्तिका) – इथे काही शिला लेख पहावयास मिळतात ज्यांवर अनाकलनीय चिन्हे व लिपि कोरलेली आहे यावरून या स्थळास भिमाची वही म्हटले जाते .

4)   कैलाश-मान सरोवर  ( तिबेट- चीन व्याप्त)  ऊंची 21778 फूट 

असे सांगितले जाते की कैलाश मानस सरोवरा जवळील ( 20 ते 30 km) या पर्वत शिखरावर आजपर्यंत कुणीही पोहोचू शकलेले नाही .  कैलाश हे सर्वात प्रसिद्ध शिखर आहे जिथे प्रत्यक्ष शिवा चा वास आहे असे मानले जाते . कैलाश हे जगाचे आध्यात्मिक केंद्र ही म्हटले जाते .

पौराणिक संदर्भ 

पौराणिक ग्रंथात उल्लेखित मेरू पर्वत हा कैलाश पर्वत च आहे असे मानले जाते. इथले मानस सरोवर हे‌ तळे अलौकीक स्वर्ग रूपी आहे व इथे स्नान केल्याने पापक्षय होतो व या मानस सरोवराचे जल प्राशन केल्याने मुक्ती प्राप्त होते अशी मान्यता या स्थळाची आहे.

केलाश-मान सरोवर जवळील ठिकाणे – 

मानसरोवर लेक (15,015 फूट )  राक्षस ताल , यम द्वार , नंदी पर्वत 

5)  मणी महेश – चंबा कैलाश  ( हिमाचल प्रदेश) उंची १३००० फूट 

पौराणिक कथे अनुसार महादेवांनी पार्वती देवी शी विवाहबद्ध  झाल्यावर या  पर्वताची  निर्मिती केली . याच कारणास्तव या पर्वतास पार्वती रूप समजून ‘गिरिजा मा ‘ म्हणून पूजले जाते .  पर्वताच्या शिलांनी शिव लिंग स्वरूपात आकार घेतल्याने व या शिवलिंगावरील मणी च्या उपस्थिती मुळे या पर्वतास मणी महेश म्हटले जाते. शिव शंकराने याच पर्वतावर आपली ७०० वर्षांची दीर्घ ध्यान साधना लावली होती.

मणी महेश कैलाश पर्वतावर सुद्धा पवित्र तळे आहे. या तळ्यात स्नान करून तळ्याच्या तीन प्रदक्षिणा केल्यास पापक्षालन होते असे भाविक मानतात. दर वर्षी भाद्रपद महिन्यात येथे मोठी यात्रा असते.

या पर्वताच्या पायथ्याला चौगण म्हटली जाणारी जागा आहे जिथे शिव पार्वती क्वचित फेरफटका मारतात असे स्थानिक मानतात.

हिमाचल सरकारने मणी महेश कैलाश यात्रेस राज्यस्तरीय दर्जा दिला आहे.

जवळील ठिकाणे :

शिव कटोरी – हे एक छोटे तळे आहे. या तळ्यात शिवजी आपल्या जटा धूवत असे भाविक मानतात.

गौरी कुंड – हे ही एक छोटे तळे आहे ज्याचे पाणी ऊबदार असे असते. या कुंडात पार्वती माता स्नान करीत असे अशी मान्यता आहे. 

भागसू धबधबा व मंदिर – यात्रेकरू भागसू धबधब्यास आवर्जून भेट देतात.इथल्या विलोभनीय दृश्याने त्यांचा श्रम परिहार होतो. जिथून हा धबधबा उगम पावतो तिथे एक शिव मंदिर ही आहे.

6) दक्षिणेतील सहावा कैलाश पर्वत अर्थात वेलीयांगिरी पर्वत –   उंची ५,८३३ फूट

Panch kailash yatra आणि तामिळनाडू मधील 6th Velliyangiri Kailash
Shiva bust at Isha foundation at foothills of Velliyangiri Kailash Pic courtesy Google 

पश्चिम घाटाच्या पर्वत रांगेतील  तामिळनाडू व केरळ च्या सीमेवर हा वेलियांगिरी पर्वत आहे. सात पर्वतांचा समूह इथे असल्यामूळे या परीसरास सप्तगिरी असेही म्हणतात.
वेलियांगिरी पर्वतास भूलोक कैलाश  किंवा दक्षिण कैलाश असेही नाव आहे.
६तासांचा कठिण ट्रेक करून व सात डोंगर पार करून या वेलियांगिरी पर्वता जवळ पोहचता येते.
कोईंमतूर पासून  हे आध्यात्मिक ठिकाण ३० कि मी आहे.
येथील शिव मंदिरात शिवा ची पंचमुखी मूर्ती पहावयास मिळते जी पंचमहाभूतांचे प्रतीक आहे.
याच पर्वताच्या पायथ्याला ईशा फाऊंडेशन चे भव्य प्रार्थना स्थळ आहे . ईशा फाऊंडेशन चे आध्यात्म गुरू सद्गुरु यांनी‌ २०१७ साली या ठिकाणी शिवाचा ११२ फूट उंच अर्धपुतळा स्थापित केला आहे जो जगातील सर्वात उंच अर्धपुतळा असल्याची गिनीज बुकात नोंद आहे. 
सद्गूरूंच्या गूरूंना याच वेलियांगिरी पर्वतावर तपश्चर्ये पश्चात अध्यात्म ज्ञान प्राप्ती झाली होती असे ते सांगतात. 

पौराणिक कथे अनुसार 

शिवा ने येथे पार्वती च्या आग्रहाखातर नृत्य केले होते. 

ईषा फाऊंडेशन प्रमुख सद्गुरु यांनी सांगितलेली पौराणिक कन्याकुमारी ची कथा

या कथे अनुसार एका शिवभक्त कन्येने शिवाशी विवाह करण्याचा प्रण केला होता . कठोर तपश्चर्ये अंती उद्याचा सूर्य उगवण्याच्या आत शिवा ने येवून माझ्याशी लग्न करावे असे आवाहन तिने शिवशंभोस केले अन्यथा मी इथेच प्राण त्याग करीन‌ असा इशारा तिने दिला. 

शिवजी अखेर या शिवभक्त मुलीशी लग्न करण्यास कैलाशा वरून पाय उतार झाले. कैलाश पर्वत सोडून ते निघाले पण या कृत्यामुळे अनर्थ होईल असे‌ देव समूहाला वाटले व यावर उपाय म्हणून तातडीने त्यांच्याकडून शिव शंभो दक्षिणेस पोहोचण्याच्या आधीच सूर्योदय करण्यात आला .  आपण वेळेत पोहोचू न‌ शकलो व त्यामूळे भक्त मुलीने प्राण गमावले या गोष्टीचे महादेवांना अपार दुःख झाले. मनात ही विशाद‌ भावना घेवून‌ शंभो याच वेलियांगिरी  पर्वतावर बसले होते त्यामुळे या पर्वतास एक वेगळे महत्त्व आहे असे सद्गुरु सांगतात. शिव-प्रेमापोटी प्राण गमावलेली ती मुलगी पुढे कन्याकुमारी या नावाने अमर झाली.

हे ही वाचा:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

2 thoughts on “Panch kailash yatra आणि तामिळनाडू मधील 6th Velliyangiri Kailash”

Leave a Comment