कोकणातील होळी सण| Konkan Shimga | Konkan Holi
वडीलांच्या सरकारी नोकरीतील बदली मुळे कोकण पट्टीतील माणगावात लहानपणाचा काही काळ गेलाय. मुंबई गोवा हायवेवर काळ नदीच्या काठावरचं लहानसं गाव होतं हे . याा माणगावतल्या होळी सणाच्या आठवणी विशेष लक्षात राहिल्यात.
Written by Avinash Bhanu Asha Ghodke
होळीची रात्र
होळीच्या रात्री पेटत्या होळ्यांमधून भाजलेले नारळ लांबसडक बांबूने बाहेर खेचले जात. हे नारळ फोडून मुलं भाजकं खोबरं खात. हे खोबरं जास्त खाल्ल की घसा बसून जाई. घसा खवखवे. अशातही” अमुकतमुक च्या बैलाला ढोल !!” अशा बोंबा मारल्या जात. मनात कुुुणाविषयी साचुन राहिलेल्या रागाला ventilate करण्याचा हा एक प्रकार आहे. ‘अमूक च्या नावाने शिमगा करणे’ असा वाक्प्रचार यातूनच रूढ झाला आहे. बोंबा मारून थकल्यावर रात्री झोपतानाही उद्याच्या रंग पंचमीचे वेध लागलेले असत.
रंगपंचमीचा दिवस
दुसर्या दिवशी सकाळीच लहान मुलं भेंडी च्या झाडावर चढून हिरवी टपोरी बोंडं तोडीत व बादलीतल्या पाण्यात ही फळे हाताने कुस्करीत. फळातल्या पिवळ्याशार गराने बादलीतले पाणी पिवळे धम्म होई. या फळांना विशिष्ट असा गंध असे जो मग पाण्याला ही येई. लहान मुलं मग याच पिवळया रंगीत पाण्याने होळी खेळीत . दुपारच्या रणरणत्या उन्हात प्लास्टिक च्या पिचकार्यांमधे हा पिवळा रंग भरून बोडक्या भात शेतातल्या पायवाटेवर एखाद्या झाडाच्या सावलीत बसून सावजाची वाट पाहिली जाई. ऊन एवढं असे की क्वचित कुणी घराबाहेर पडे मग कुणी वाटसरू आला की त्याला घेरून “ऐना की बैना.. घेतल्याशिवाय जाईना!! “या घोषवाक्याचा घोका सुरू होई. ‘ रंग लावून घ्यायचा नसेल तर पैसे दे.. ते घेतल्या शिवाय जाणार नाही’ अशी स्पष्ट धमकीवजा सूचना वाटसरूला या घोषवाक्यातून दिली जाई . अशावेळी भेंडीच्या पानाची नळी करून कुणी पिपाणी वाजवी तर कुणी टिन चा डबा बडवी . ही पिवळ्या रंगानी माखलेली गँग बघून काही लोक दहा पाच पैसे देवून टाकित तर एखादा सायकलवाला खडूस काका अंगावर खेकसे. ही पिवळी गँग बाजारात जावून दुकानदारांकडूनही वसूली करी . गरम वडे भजी तळणार्या हाॅटेल वाल्याकडूनही होळीची वसूली केली जायी आणि मग तिथेच गोल भज्यांची आॅर्डर देवून जमलेली वसूली खर्च केली जायी. सामुहिक आंघोळीचा कार्यक्रम काळ नदीवर किंवा पश्चिमेकडच्या केनाॅलवर असे.
पुरणपोळीने होळीची सांगता आणि नवे जगणे
रात्री आदल्या दिवसाची उरलेली पुरळपोळी आई गरम करून ताटात वाढे. पोळीतल्या पुरळाचा रंग गंध चव अजूनही ताजी वाटे. भेंडीच्या बोंडांचा पिवळा रंग अजून हातांवरून उतरले
ला नसे. त्याच पिवळ्या हाताने त्या पिवळ्या पुरणाच्या पोळीचा घास घेवून होळीची सांगता होई. पिवळया रंगाची अध्यात्मिक महती लोकपरंपरेतही मान्य केली गेली आहे. हा रंग पक्वतेचा ,संपन्नतेचा सूचक आहे आणि या रंगाला भेंडीच्या बोंडांचा वास असतो तेंव्हा तो मानवी मनाच्या चिवट जीवन आसक्तीचा सूचक होतो.मनातल्या जुनाट कुंठांची होळी करून तो नव्याने जगण्याला गाठतो आणि ‘ऐना के बैना.. घेतल्याशिवाय जायना ” चा धोषा लावतो…
About The Author
administrator
Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.