चिंचवडचे मोर्या गोसावी मंदिर हे पुण्यातील सर्वात महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. पवना नदीच्या अगदी काठावर वसलेले हे मंदिर सुमारे साडेचारशे वर्षांहून अधिक जुने असून, गणेशभक्तांचे ते श्रद्धास्थान आहे. चिंचवड गावचे हे ग्रामदैवत असून, दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
मोर्या गोसावी कोण होते?

मोर्या गोसावी हे गाणपत्य संप्रदायाचे एक महान संत होते. या संप्रदायात गणेशाला सर्वोच्च देवता मानले जाते. एकमेव रित्या फक्त गणेशाची निस्सीम भक्ती हे या संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मोरया गोसावी हे याच पद्धतीने गणेशा च्या आराधनेत आयुष्यभर लीन होते. त्यांचा जन्म ही गणेश आशिर्वादानेच झाला असे त्यांची जन्मकथा सांगते.
मोर्या गोसावी यांची जन्म कथा
मोर्या गोसावी यांचे वडील वामन पाटील यांनी मोरगाव येथे ४८ वर्षे कठोर तपश्चर्या केली. गणेशाने प्रसन्न होऊन त्यांना वचन दिले की ते स्वतः त्यांच्या घरी पुत्ररूपात जन्म घेतील.मोरया गोसावी यांचा जन्म मोरगाव जवळील पवळी येथे इ.स. १३७५ मध्ये झाला आणि त्यांना गणेशाचा अवतार मानले जाऊ लागले.
मोर्या लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी आणि आध्यात्मिक होते. ते योगसाधना आणि गणेश-उपासनेत पारंगत होते. मोरगावला दर्शनासाठी गेले असता त्यांना अडवले गेले, तेव्हा गणेशाने त्यांना दृष्टांत देऊन चिंचवड येथे नवीन उपासना केंद्र स्थापन करण्याचा सल्ला दिला. मोर्या हे चिंचवड ला पवना नदीच्या काठी आले आणि येथेच ते गणेशाची उपासना करू लागले.
गणपतीचा दृष्टांतातून आदेश – दर महिना 90 KM ची वारी
मोरया गोसावी यांना गणपतीने स्वतः दृष्टांतातून आदेश दिला होता की..
“तू आता पवना नदीच्या तीरावर असलेल्या चिंचवड गावी जाऊन राहा आणि दर महिन्याच्या विनायकी चतुर्थीस मोरगाव वारीस येत जा” .
या दृष्टांतामुळे मोरगावला दर महिन्याला ९० कि.मी. चालत वारी करणे हे मोर्या गोसावी यांचे धार्मिक नित्य कर्म बनून गेले व ते त्यांनी आयुष्यभर फार श्रद्धेने व प्रेमाने पाळले. श्री गणेशाच्या आशीर्वादाने मोर्या गणेशांना विलक्षण अशी दीर्घायू लाभली असे मानले जाते. वयोमान ११४ झाले तरी ते नित्य नेमाने मोरगाव च्या मयुरेश्वर गणेशाचे दर्शन घेण्यास न चुकता येत होते असे भक्तांची मौखिक इतिहास परंपरा सांगते. मोरया गोसावी यांचे वयमान झाल्यावर त्यांना श्री गणेशाचा दुसरा दृष्टांत झाला असेही ही परंपरा सांगते.
११४ व्या वमयोमानात दुसर दृष्टांत
शके १४११ (इ.स. १४८९) मध्ये मोरया गोसावी नेहमीप्रमाणे मोरगावला वारीसाठी गेले असता, मयूरेश्वराने त्यांना खालील प्रमाणे दृष्टांत दिला:
“आता तू वृद्ध झालास. वारीस येताना तुझे फार हाल होतात. ते मला पाहवत नाही. पुढे तू वारीला येऊ नकोस. मी चिंचवडला येतो.”
या दृष्टांतानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नदीत अर्ध्य देताना तिसऱ्या अर्ध्याच्या वेळी त्यांच्या ओंजळीत शेंदरी रंगाचा तांदळा (गणेश मुखी पाषाण )आला. ती मूर्ती त्यांनी चिंचवडला देऊळ वाड्यात (मंगलमूर्ती वाडा) आणून तिची प्राणप्रतिष्ठापना केली.
चिंचवड येथे गणेश मूर्ती ची स्थापना केल्यानंतर पुढील ३ वर्षे मोरया गोसावी यांनी वयाच्या ११७ व्या वर्षापर्यंत मोरगावची वारी सुरूच ठेवली, त्यानंतर त्यांनी इ.स. १५६१ मध्ये वयाच्या १८६ व्या वर्षी चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली.
मोरया गोसावी यांचे वरील वयमान व वर्ष नोंदी भक्तांच्या मौखिक इतिहास परंपरनुसार ग्राह्य मानल्या गेल्या आहेत. या व्यतिरिक्त संशोधनातून काही वेगळे तर्क ही पुढे आले आहेत.
समाधी वर्ष १५६१ की १६५५ ? पारंपारिक व संशोधकीय अशा दोन नोंदी
दुसरा संशोधकीय मत प्रवाह असे मानतो की १६५५ मध्ये मोर्या गोसावी यांनी चिंचवड येथे योगमार्गाने स्वेच्छेने ‘संजीवन समाधी’ घेतली व त्यांचे पुत्र चिंतामणी यांनी १६५९ मध्ये येथे मंदिर उभारले.
मोरया गोसावी यांच्या समाधीच्या तारखेबाबत दोन नोंदी आढळतात:
१) परंपरेनुसार – इ.स. १५६१:स्थानिक परंपरा आणि समाधी महोत्सवाच्या वार्षिक गणनेनुसार (२०२५ मध्ये ४६४ वा महोत्सव) मोरया गोसावी यांनी इ.स. १५६१ मध्ये चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. जन्म इ.स. १३७५ मानल्यास त्यावेळी त्यांचे वय १८६ वर्षे होते.
२) संशोधन/पुराव्यानुसार – इ.स. १६५५:काही ऐतिहासिक नोंदी आणि पुरातत्वीय संदर्भांनुसार समाधीचे वर्ष इ.स. १६५५ मानले जाते. त्यानुसार मंदिराचे बांधकाम त्यांचे पुत्र चिंतामणी यांनी इ.स. १६५९ मध्ये पूर्ण केले. या मतानुसार जन्मवर्ष १३७५ न मानता १५७५ किंवा १६१० च्या आसपास मानले जाते, ज्यामुळे वय अंदाजे ४५ ते ८० वर्षे होते. या मतप्रवाहानुसार मोरया गोसावी संत तुकारामांचे समकालीन ठरतात.
निष्कर्ष:दोन्ही नोंदी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळतात. परंपरा १५६१ वापरते, तर संशोधन १६५५ कडे झुकते. कोणतीही एक तारीख सर्वमान्य ठरलेली नाही.
Directorate of Archaeology and Museums ने जून २०२६ मध्ये केलेल्या संशोधनाचा तपशील खालीलप्रमाणे:
संशोधनाचे स्वरूप हे विशेष “उत्खनन” नसून, चालू असलेल्या जतन आणि पुनर्संचयन कामादरम्यान आढळलेले संशोधन आहे . मोरया गोसावी समाधी संकुलातील जुने बांधकाम साफ करत असताना तांब्याच्या पाट्या सापडल्या(ताम्रपट). तांब्याच्या पाट्यांवरील कोरीव लेखात मूळ समाधी संरचना इ.स. १६२५ मध्ये (शके १५४७) उभारल्याची आणि नंतर इ.स. १७१० मध्ये (शके १६३२) दुसऱ्या संरचनेचे काम व विस्तार पूर्ण झाल्याची नोंद आहे. या तांब्याच्या पाट्या देवनागरी लिपीत व संस्कृत भाषेत कोरलेल्या असून त्यात नारायणदेव या दगडकाम करणाऱ्या कारागिराचाही उल्लेख आहे . सदर ताम्रपटांचे संशोधन अजून चालू आहे. Hindustan Times व आघाडीच्या राष्ट्रीय वर्तमानपत्रांतून याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
तारीख व काळा बाबत वरील दोन मतांतरे असली तरी मोरया गोसावी यांच्या निस्सीम व आंतरिक गणेश भक्ती बाबत कोणताही मतभेद नाही. मोरया गोसावी यांचे चिंचवड येथील पवना नदी काठचे समाधी मंदिर आज त्यांच्या गणेश भक्तीची जीवंत साक्ष बनून उभे आहे. या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेतल्याने अष्टविनायक दर्शन केल्याचे पुण्य मिळते असे गणेश भक्त मानतात.

मंदिरात काय पाहावे?
मंदिर पवना नदीच्या काठाला अगदी समतल असल्यामुळे प्रवेश द्वारा पासून पायर्या उतरून मंदिर प्रांगणात यावे लागते. दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात दीपमाळ तुमचे स्वागत करते.

मंदिराची रचना साधी पण भव्य आहे. पारंपरिक दगडी बांधकाम असून, संपूर्ण वातावरण शांत आणि पवित्र आहे.
· मोर्यांची समाधी – मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताच संत मोर्या गोसावी यांची समाधी दिसते. तिच्या वरती दोन हातांची गणेशमूर्ती विराजमान आहे.
· काळ्या दगडाची गणेशमूर्ती – १९५६ मध्ये पूर्वी शेंदूर लावलेल्या मोठ्या मूर्तीचे आवरण निघाले, तेव्हा आतून एक सुंदर काळ्या दगडाची गणेशमूर्ती प्रकट झाली. आज हीच मूर्ती मुख्य पूजेचा केंद्रबिंदू आहे.
· अर्जुनेश्वर लिंग – बाह्य मंडपात मोठे अर्जुनेश्वर दगडी लिंग आहे. मोर्यांच्या समाधीकडे जाणारा मार्ग येथूनच सुरू होतो असे मानले जाते.
धार्मिक कार्यक्रम आणि परंपरा
दर महिन्याच्या चतुर्थीला मंदिरात विशेष गर्दी असते. भाविक अथर्ववेदातील गणेशस्तोत्रांचे पठण करतात आणि चंद्रोदयानंतर महाप्रसाद वाटला जातो.
वर्षातून दोन वेळा पालखी सोहळा होतो – भाद्रपद आणि माघ महिन्यात. मोर्यांची पालखी चिंचवडहून मोरगावच्या मोरेश्वर मंदिराकडे पायी प्रस्थान करते. वाटेत पुण्यातील कसबा गणपती मंदिरात पालखी थांबून पूजा घेतली जाते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे.
प्रवासासाठी उपयुक्त माहिती
· पत्ता: गांधी पेठ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे – ४११०३३
· दर्शन वेळ: सकाळी सुमारे ६:०० ते रात्री ९:३०
· दर्जा: महाराष्ट्र शासनाने या मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ घोषित केले आहे. परिसर सुशोभीकरण आणि सुविधा विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर चिंचवड परिसराची ग्रामदैवत परंपरा आणि स्थानिक समुदायाच्या जीवनाशी घट्ट विणलेले आहे. गाणपत्य संप्रदायाचे ‘आदिगुरू’ मानले जाणारे मोर्या गोसावी यांची समाधी आजही संपूर्ण महाराष्ट्रातून आणि बाहेरून भाविकांना आकर्षित करते. आपणही या मंदिरास एकदा नक्की भेट द्या
मोरया! 🚩
टिप:चिंचवड देवस्थान ट्रस्ट अष्टविनायकांपैकी मोरगाव, सिद्धटेक आणि थेऊर या तीन मंदिरांचे व्यवस्थापन करते. म्हणजेच चिंचवडचे मंदिर अष्टविनायकांचा भाग नसले तरी त्यांच्याशी प्रशासकीय आणि आध्यात्मिकदृष्ट्या जोडलेले आहे.
हे ही वाचा
▶️गायक संंजू राठोड- हिंदित अपयशी मराठीत मात्र Hit- आईच्या सल्ल्याने मिळाले यश – म्हणाली होती..
मोरया गोसावी मंदिर कुठे आहे?
चिंचवड गाव, PCMC,पुणे, महाराष्ट्र येथे पवना नदीच्या काठावर हे मंदिर आहे.
मोरया गोसावी कोण होते?
ते गाणपत्य संप्रदायाचे आदिगुरू आणि गणेशाचे परमभक्त संत होते.
. “गणपती बाप्पा मोरया” या घोषणेत ‘मोरया’ का म्हणतात?
हा शब्द संत मोरया गोसावी यांच्या नावातून आला आहे. गणेशाने त्यांना वर दिला होता की त्यांचे नाव गणेशाच्या नावापुढे घेतले जाईल.
त्यांनी चिंचवड येथे गणेश मूर्ती कधी स्थापित केली?
परंपरेनुसार १४८९ मध्ये (वयाच्या ११४ व्या वर्षी), जेव्हा मयूरेश्वरांनी त्यांना चिंचवडला दर्शन दिले.
मोरया गोसावींनी चिरंजीव समाधी कधी घेतली?
दोन नोंदी आढळतात: परंपरेनुसार १५६१, संशोधनानुसार १६५५.
चिरंजीव समाधी म्हणजे काय?
चिरंजीव समाधी म्हणजे जीवंत समाधी. अशी समाधी संत ज्ञानेश्वरांनीही घेतली होती
मोरया गोसावी चिंचवड मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे का?
नाही. पण चिंचवड देवस्थान ट्रस्ट अष्टविनायकांपैकी मोरगाव, सिद्धटेक आणि थेऊर या तीन मंदिरांचे व्यवस्थापन करते.
मोठे धार्मिक कार्यक्रम कोणते?
दर महिन्याची चतुर्थी आणि वर्षातून दोन वेळा पालखी सोहळा (भाद्रपद व माघ महिन्यात).
मोरया गोसावी संत तुकाराम यांचे समकालीन होते का?
काही अभ्यासक त्यांना १६१०–१६५९ या काळातील मानतात, ज्यामुळे ते तुकारामांच्या (१६०८–१६५०) समकालीन ठरतात.
पुरातत्व संशोधनात काय आढळले?
तांब्याच्या पाट्या, ज्यात मूळ समाधी संरचना इ.स. १६२५ मध्ये स्थापल्याची नोंद आहे.
चिंचवड ते मोरगाव अंतर किती आहे?
चिंचवड ते मोरगाव हे अंतर 90 ते 92 कि.मी. इतके आहे

